दिवाळीआधी शेतकऱ्यांना सरकारचा आर्थिक दिलासा; ७३ लाख खात्यांत ५ हजार रुपये जमा, २१ लाखांचे कर्ज माफ!

    04-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ५ हजार रुपयांच्या सानुग्रह आर्थिक मदतीचे वितरण वेगाने सुरू असून, आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम पोहोचलेली नाही, त्यांनाही लवकरच पैसे मिळणार आहेत. पुढील एक ते दोन दिवसांत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आर्थिक मदत जमा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील आतापर्यंत २१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची माहिती सरकारने दिली आहे.

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा सण साजरा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याबरोबरच त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधीही या उपक्रमातून मिळणार आहे.

एकीकडे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा होत आहे, तर दुसरीकडे कर्जमाफीची आकडेवारीही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या या निर्णयांची सध्या चर्चा सुरू आहे.