लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा करत होता वापर
Image Source:(Internet)
मुंबई : बॉलिवूडमधील Bollywood कलाकार आणि नामांकित व्यावसायिकांना धमकीचे संदेश पाठवून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अभिनेता तुषार कपूर, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना धमकावल्याचा संशय असलेल्या वैभव मिश्रा याला पोलिसांनी बेंगळुरूमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पाठवत होता धमकीचे संदेश-
तपासातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वैभव मिश्रा हा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाचा आधार घेत कलाकार आणि व्यावसायिकांना धमकीचे ऑडिओ संदेश पाठवत होता. या संदेशांमुळे अनेक सेलिब्रिटींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
धमकीचे संदेश कोण पाठवत आहे आणि त्यामागे नेमका उद्देश काय आहे, याचा मुंबई पोलीस शोध घेत होते. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला आणि बेंगळुरूमधून त्याला ताब्यात घेतले.
आरोपी आयटी इंजिनिअर असल्याची माहिती-
अटक करण्यात आलेला वैभव मिश्रा हा आयटी इंजिनिअर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याने नेमक्या किती सेलिब्रिटींना धमकी दिली आणि या घटनांमध्ये त्याचा किती सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकारात त्याला अन्य कोणाची मदत मिळाली होती का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
टायगर श्रॉफच्या वाहनावर हल्ला; तीन आरोपींनाही अटक-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ याच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक १८ वर्षांचा असून, अन्य दोघे २२ वर्षांचे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य करून त्याच्या वाहनावर हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडून पळ काढला. मात्र, पोलिसांनी काही तासांतच त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
मनोरंजन विश्वात चिंतेचे वातावरण-
एकीकडे बॉलिवूड कलाकारांना धमकीचे संदेश पाठवण्याचे प्रकार, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या वाहनावर हल्ल्याची घटना समोर आल्याने मनोरंजन क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. वैभव मिश्रा याच्या चौकशीतून धमकी प्रकरणामागील नेमके कारण आणि संभाव्य सहकाऱ्यांची माहिती समोर येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.