Image Source:(Internet)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि विविध मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी जोरदार टीका केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट अमित शहा यांनी महाराष्ट्राला दुबळे करण्यासाठी निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला. हे दोन्ही गट आगामी काळात आपले अस्तित्व गमावतील, असा दावाही त्यांनी केला. अमित शहांच्या पायाशी बसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधले जात असल्याची टीका त्यांनी केली. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष अनाथ झाला असून हा पक्ष शरद पवार यांचाच आहे, तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे ते म्हणाले.
अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी चर्चेची मागणी नसून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचे स्पष्ट केले. लोकशाहीचा खून करणारेच लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना, सत्ताबदल करण्याचा निर्णय आम्हीच घेणार असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस यांना रक्ताची गरज पडल्यास रक्तदान शिबिर आयोजित करू, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना ते दिल्लीत राहतील, मात्र तिहार तुरुंगात जातील, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
चिनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडात १ हजार ७१४ कोटी रुपये, तर भाजपच्या पक्षनिधीत ९११ कोटी रुपये आल्याचा आरोपही राऊत यांनी केला. या निधीच्या बदल्यात अरुणाचल प्रदेश आणि लडाखमधील जमीन चीनला दिल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, अभिनेत्री दिया मिर्झा यांनी प्रदूषणाबाबत मत व्यक्त केले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवण्याचा अधिकार कुणाला दिला, असा सवाल करत राऊत यांनी त्यांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली.
पाचशे कोटी रुपयांच्या कथित क्लिप प्रकरणावर एसआयटीच्या तपासाकडे लक्ष असल्याचे सांगत, आठ दिवसांत कारवाई आणि पैशांचा हिशेब न मिळाल्यास जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच ठाणे पोलीस प्रशासनातील वर्षानुवर्षे कायम असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित करत पोलीस यंत्रणेत बदल करण्याची मागणी केली. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात पुरावे असूनही अटक का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.