
Image Source:(Internet)
मुंबई : दिवाळी आणि सनातन हिंदू धर्माबाबत भाष्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा यांना भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सनातन हिंदू धर्म आणि दिवाळीच्या परंपरांबाबत बोलण्यापूर्वी त्यामागील धार्मिक महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. कलाकारांनी ज्या विषयांची माहिती आहे, त्याच विषयांवर भाष्य करावे, अशा शब्दांत राम कदम यांनी दिया मिर्झांना सुनावले.
दिवाळी म्हणजे केवळ एकत्र येणे, आनंद साजरा करणे किंवा पार्टी करणे एवढ्यापुरता मर्यादित सण नाही. धनत्रयोदशीपासून सुरू होणारा आणि तुळशी विवाहापर्यंत चालणारा हा उत्सव विविध धार्मिक विधी, श्रद्धा आणि परंपरांशी जोडलेला आहे. या प्रत्येक परंपरेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीचा खरा अर्थ आणि तिच्याशी संबंधित धार्मिक भावना समजून घेणे गरजेचे असल्याचे राम कदम यांनी म्हटले.
सनातन हिंदू धर्माचा गाभा सहिष्णुता, दुसऱ्याला त्रास न देणे आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवणे हा आहे. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण सनातन धर्म देतो. त्यामुळे या धर्माबाबत मत व्यक्त करताना त्यातील मूल्ये आणि परंपरांचा अभ्यास असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दिया मिर्झा यांनी दिवाळी आणि सनातन हिंदू धर्मासारख्या विषयांवर भाष्य करण्याऐवजी आपल्या कला क्षेत्रातील कामाबाबत बोलावे, असा सल्लाही राम कदम यांनी दिला. त्यांच्या या विधानामुळे दिया मिर्झा यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या चर्चेला आता राजकीय वळण मिळाले आहे.