Image Source:(Internet)
नागपूर : मेयो रुग्णालय Mayo Hospital परिसरात खासगी रुग्णवाहिका चालविणाऱ्या दोन गटांमधील वाद चांगलाच चिघळला. रुग्णांना घेऊन जाण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर रात्री संतप्त सदस्यांनी तीन रुग्णवाहिकांची तोडफोड केल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे मेयो रुग्णालयासमोरील परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मेयो आणि मेडिकल रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. याचाच फायदा घेत काहीजण रुग्णांना खासगी रुग्णालयांत पाठविण्याचे काम करीत असल्याची चर्चा आहे. या परिसरात खासगी रुग्णवाहिका चालकांचे स्वतंत्र गट असून, रुग्णांना घेऊन जाण्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याचे सांगितले जाते.
मंगळवारी सकाळपासून दोन्ही गटांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दुपारी दोन्ही बाजूंनी मारहाण करण्यात आली. रात्री पुन्हा वाद उफाळून आल्याने तीन अॅम्बुलन्सची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण परिस्थिती कायम होती. दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.