
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडे प्लॉट चौक परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी (३ नोव्हेंबर) पहाटे छापा टाकून एमडी (मेफेड्रोन) सदृश्य पावडर जप्त केली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडे प्लॉट चौकातील विशाल मेगा मार्टसमोर पहाटे ४.१० ते सकाळी ६.२० या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यावेळी सुरज गोपाळराव कठाणे (३०) आणि हर्षल विनोद अबगड (२५), दोघेही रा. नंदनवन झोपडपट्टी, नागपूर, यांना ताब्यात घेण्यात आले.
मोबाईल आणि मोपेडसह लाखोंचा मुद्देमाल जप्त-
संशयितांकडून पोलिसांनी ५२.७०० ग्रॅम एमडीसदृश्य पावडर जप्त केली. तिची किंमत १ लाख ५८ हजार १०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय एक वनप्लस मोबाईल (२० हजार रुपये), दोन व्हीओ मोबाईल (एकूण २० हजार रुपये) आणि डिओ मोपेड (७० हजार रुपये) असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत २ लाख ६८ हजार १०० रुपये आहे.
तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू-
या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाचे आनंद बिचेवार यांच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २२(क) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी सहभागी असल्याचा संशय असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.