
Image Source:(Internet)
नागपूर : देशातील भाजप सरकारच्या धोरणांमुळे लोकशाही मूल्ये, शिक्षणव्यवस्था आणि रोजगाराच्या प्रश्नांवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणाचे खासगीकरण, वाढती बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात देशभरातील तरुणाई संघटित होत असून, या सरकारला सत्तेवरून हटविल्याशिवाय विद्यार्थी आंदोलन थांबणार नाही, असा इशारा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) नेत्या नेहा बोरा यांनी दिला.
नागपुरातील जवाहर विद्यार्थी गृह येथे २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आयसाच्या ११व्या अखिल भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी नागपुरात आलेल्या नेहा बोरा यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारला घेरणार-
स्वातंत्र्यानंतरच्या काळात विद्यार्थी चळवळींनी देशाच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या शिक्षणव्यवस्थेचे खासगीकरण, बेरोजगारी आणि लोकशाही संस्थांवरील दबाव या मुद्द्यांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहेत. सरकारच्या विद्यार्थीविरोधी धोरणांना संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार तरुणांनी केला असल्याचे बोरा यांनी सांगितले.
विद्यापीठांमधील जातीय भेदभावाचा मुद्दा ऐरणीवर-
देशातील केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयटीसारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्येही जातीय भेदभावाच्या घटना समोर येत आहेत. अशा घटनांमुळे अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना भेदभावापासून संरक्षण देण्यासाठी रोहित कायदा लागू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशात ओबीसी समाजातील पंतप्रधान आणि आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती आहेत, असा उल्लेख करून जातीय भेदभावाचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. घटनात्मक पदांवरील प्रतिनिधित्व आणि प्रत्यक्ष शैक्षणिक संस्थांमधील सामाजिक वास्तव या दोन वेगळ्या बाबी असल्याचे बोरा म्हणाल्या.
नागपूरमधून मनुवादी विचारसरणीला विरोध-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातून लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ आवाज बुलंद करण्याचा निर्धार आयसाने केला आहे. संघाच्या विचारधारेमुळे लोकशाहीसमोर आव्हाने निर्माण होत असून मनुवादी विचारांना प्रोत्साहन मिळत असल्याची टीका बोरा यांनी केली. याच पार्श्वभूमीवर नागपुरात राष्ट्रीय संमेलन आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभाव आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांविरोधात शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी रॅली काढण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक शिक्षणव्यवस्था मजबूत करण्याऐवजी खासगी शिक्षण संस्थांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत, शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आवाक्यात राहिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.