
Image Source:(Internet)
पुणे : पुणे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा जाहिरात फलकांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला आता अधिक वेग मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या कारवाईचे जाहीर कौतुक केल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कारवाई आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्या सुरू असलेली मोहीम पुरेशी नसून आगामी काळात अधिक व्यापक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला सरकारकडूनही पाठबळ मिळाल्याचे चित्र आहे.
पुणे शहरातील बेकायदा होर्डिंग्जमुळे होणारे विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने 'भाऊ, फ्लेक्स काढा' ही मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांना तक्रार नोंदविता यावी यासाठी स्वतंत्र संकेतस्थळही सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत १ हजार ८८२ हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमेत महापौरांसह भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अनधिकृत फ्लेक्सही समोर आले. याच कारवाईची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले.
बेकायदा होर्डिंग्ज ही केवळ पुण्यापुरती मर्यादित समस्या नसून देशभरातील शहरांसमोरील आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांचा वापर नागरिकांना मोकळेपणाने करता आला पाहिजे. नियम केवळ कागदावर राहू नयेत, तर त्यांची अंमलबजावणीही झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. विशेष म्हणजे, माझ्या नावाचेही बेकायदा होर्डिंग लागल्यास कारवाईच्या यादीत माझे नाव टाका, असे सांगत त्यांनी राजकीय नेत्यांनाही स्पष्ट संदेश दिला. नागपुरातही हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत होर्डिंग्ज लावले जाण्याची शक्यता लक्षात घेता, आतापासूनच जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.
दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनीही कारवाईबाबत कठोर भूमिका घेतली आहे. काही व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमण हटवत असले, तरी पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू असल्याचे आढळून येत आहे. अशा ठिकाणीही कारवाई केली जाणार आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी पदपथांवर उभारलेल्या कार्यालयांनाही कारवाईतून सूट मिळणार नाही. महापालिका अधिकारी ज्या ठिकाणी कारवाई करण्यास मागेपुढे पाहतील, तेथे स्वतः पुढाकार घेऊन कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.