क्राइम ब्रँचची धडक कारवाई! नागपुरात 6.60 लाखांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

    28-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-4 ने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून नायलॉन मांजाचे एकूण 420 सीलबंद कोन आणि तीन मोबाईल फोन असा सुमारे 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

27 नोव्हेंबर 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊत नगर परिसरातील शिक्षक कॉलनी, प्लॉट क्रमांक 141 येथे राहणारा अमर उरकुडे हा प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा करून विक्रीच्या तयारीत आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आठ मोठ्या खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये नायलॉन मांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत MONO KITE कंपनीचे 150 सीलबंद कोन जप्त करण्यात आले. त्यांची किंमत अंदाजे 2 लाख 25 हजार रुपये आहे. तर MONO KITE FIGHTER कंपनीचे 270 कोन जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत 4 लाख 5 हजार रुपये आहे.

अशाप्रकारे एकूण 420 कोन नायलॉन मांजाची किंमत 6 लाख 30 हजार रुपये आहे. याशिवाय तीन मोबाईल फोन, ज्यांची किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे, तेही जप्त करण्यात आले. एकूण 6 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी-

वंश अनमोल जैस (वय 18), रा. जुनी शुक्रवारी, कोतवाली, नागपूर.
शिवांश चंद्रप्रकाश साहू (वय 24), रा. सोमवारी क्वार्टर, सक्करदरा, नागपूर.
अमर रामेश्वर उरकुडे (वय 18), रा. शिक्षक कॉलनी, राऊत नगर, वाठोडा, नागपूर.

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी हा प्रतिबंधित नायलॉन मांजा ओमनगर, सुदामपुरी येथील प्रेम बैस याच्याकडून आणल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता प्रेम बैसचा शोध सुरू आहे.

हा मांजा नेमका कुठून आणला जात होता, नागपूर शहरातील कोणत्या भागांमध्ये त्याची विक्री होणार होती आणि या अवैध व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे आणि पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत गुन्हे शाखा युनिट-4 चे पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक वैभव बारंगे, पोलीस उपनिरीक्षक जितेशाचारी आरवेल्ली तसेच पोलीस हवालदार अभिषेक शनिवारे, देवेंद्र नवघरे, भगवतीकुमार ठाकूर, पोलीस कर्मचारी संतोष दुर्गे, नितीन पवार, श्रीकांत मारवाडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या कारवाईनंतर आता प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हा साठा कुठून आला आणि या व्यवसायामागे आणखी कोणाचे जाळे सक्रिय आहे, याचा तपास सुरू आहे.