
Image Source:(Internet)
पंढरपूर : उद्योगपती गौतम अदानी यांनी मनात आणले तर सुप्रिया सुळे एका क्षणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊ शकतात, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. अदानीच देशातील सत्ता ठरवतात, असा आरोपही त्यांनी केला. हाके यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
लक्ष्मण हाके आज पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सर्वांची धोरणे एकसारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार हे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची मांडणी करतात. मात्र, ते भाजपसोबत काम करत असतील तर त्यांच्या पुरोगामी विचारांचे काय, असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे यांची ओळख स्वतंत्र खासदार म्हणून असली, तरी त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत. अशा परिस्थितीत त्या भाजपचे समर्थन करत असतील तर विरोधक नेमके कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संघ, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील आमदार-खासदार एकाच धोरणाने काम करत असल्याचा दावा करत हाके यांनी राजकीय पक्षांच्या भूमिकेवर निशाणा साधला.