
Image Source:(Internet)
नागपूर : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या प्रस्तावावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या पार्श्वभू मीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला लक्ष्य करत महत्त्वाचा दावा केला आहे. शरद पवार यांच्या गटाने या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून, काँग्रेसचेही अनेक खासदार पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत या निर्णयाला सहकार्य करतील, असे त्यांनी म्हटले आहे. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी हा दावा केला.
मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाची संधी वाढेल. सध्याच्या मोठ्या मतदारसंघांमुळे लोकप्रतिनिधींना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे अवघड होत आहे. त्यामुळे मतदारसंघांचा आकार कमी होणे गरजेचे आहे. या बदलामुळे खासदार आणि आमदारांची संख्या वाढण्यासोबतच प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच ३३ टक्के महिला आरक्षणामुळे महिलांना राजकीय निर्णयप्रक्रियेत अधिक सहभाग मिळेल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचा विरोध हा धोरणात्मक नसून केवळ नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याच्या राजकारणातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण लागू झाल्यास काँग्रेसचे राजकीय गणित बिघडेल आणि भविष्यात सत्तेत येण्याची संधी कमी होईल, अशी भीती पक्षाला वाटत असल्याचे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे खासदार या प्रस्तावाच्या बाजूने असले तरी पक्षाच्या दबावामुळे त्यांना आपली भूमिका उघड करता येत नाही. मात्र, मतदानाच्या वेळी काँग्रेसमधील अनेक खासदार समर्थन देतील, असा दावा त्यांनी केला.
शरद पवार यांनी काँग्रेसला मदत केली तेव्हा ते चांगले होते; मात्र आता त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे, असे म्हणत बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेला या घडामोडींमुळे धक्का बसत असल्याने काँग्रेस नेते विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना या प्रस्तावाचे महत्त्व समजते आणि ते त्याला पाठिंबा देतील, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.