नंदनवनमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; ६० वर्षीय शेजारी आरोपी अटकेत

    28-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नंदनवन परिसरात आठ वर्षांच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या चिमुरडीला बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी ३३ वर्षीय महिलेची आठ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीने तिला एकटी पाहून बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने यापूर्वीही अनेकदा मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, याबाबत कुणाला सांगितल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत.