मुंबईत १२.२० कोटींचे चरस पकडले; LTT परिसरातून दोघे तस्कर जेरबंद!

    27-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात छापा टाकून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी पथकाने १२ किलो २०० ग्रॅम चरस जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चरसची किंमत तब्बल १२ कोटी २० लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

२४ नोव्हेंबरच्या रात्री सुरू झालेली ही कारवाई २५ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत सुरू होती. अटक करण्यात आलेल्या दोघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस मुंबईत कोणामार्फत आणण्यात आले, त्याचा पुरवठादार कोण आणि या तस्करीमागे नेमके कोणाचे जाळे आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या तस्करीचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आहे. त्यामुळे या कारवाईतून अमली पदार्थांच्या आंतरराज्यीय तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.