पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा तपशील जाहीर

Image Source:(Internet)
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये राज्यभरातील मंत्री, आमदार आणि महत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ वाढणार असल्याने पोलीस प्रशासनाने सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे. संपूर्ण अधिवेशन काळात शहरातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ८ हजार २६९ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड सांभाळणार आहेत. यासाठी स्थानिक पोलिसांसोबतच बाहेरील जिल्ह्यांतील मनुष्यबळही मागविण्यात आले आहे. पाच SRPF कंपन्या, कमांडो पथके आणि BDDS च्या विशेष तुकड्यांनाही तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी दिली.
स्थानिक पोलिसांसोबत बाहेरील जिल्ह्यांचे मनुष्यबळ-
एकूण बंदोबस्तापैकी २ हजार ३१९ पोलीस अधिकारी-कर्मचारी नागपूर शहरातील असतील, तर उर्वरित ५ हजार ९५० पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड बाहेरील जिल्ह्यांतून बोलावण्यात आले आहेत. विधान भवन परिसर, रविभवन, मंत्र्यांची निवासस्थाने आणि महत्त्वाच्या मार्गांवर पोलिसांचा पहारा राहणार आहे. त्याचबरोबर अधिवेशनादरम्यान होणारे मोर्चे, आंदोलने आणि गर्दीच्या ठिकाणांचा विचार करून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
संवेदनशील भागांवर विशेष नजर-
सुरक्षा व्यवस्थेत केवळ मनुष्यबळच नव्हे, तर विशेष पथकांचाही समावेश करण्यात आला आहे. BDDS ची २० पथके संभाव्य धोके लक्षात घेऊन तपासणीची जबाबदारी पार पाडतील. कमांडो पथकेही महत्त्वाच्या ठिकाणी सज्ज राहणार आहेत. बंदोबस्तातील सर्व पथकांमध्ये समन्वय राखण्यासाठी व्हॉट्सॲपसह आधुनिक संपर्क यंत्रणेचा वापर केला जाईल. अधिवेशनाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.