उच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना १० दिवसांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश

Image Source:(Internet)
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. पक्षातील फुटीनंतर विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करण्यात आलेल्या ऋतुब्रत बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी केलेली त्यांची नियुक्ती न्यायालयाने रद्द केली असून, विरोधी पक्षनेतेपदाबाबत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
नेमका वाद काय?
तृणमूल काँग्रेसमधील फुटीनंतर ऋतुब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट सक्रिय झाला होता. विधानसभा अध्यक्षांनी त्यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, या नियुक्तीला ममता बॅनर्जी गटातील ज्येष्ठ नेते शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत चट्टोपाध्याय यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी सहमती झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
याचिकेनुसार, ६ मे २०२६ रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीला ऋतुब्रत बॅनर्जी यांच्यासह ७० आमदार उपस्थित होते. या बैठकीत शोभनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १९ मे रोजी त्यांच्या नावाचे अधिकृत पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते.
दरम्यान, या पत्रावर अनेक आमदारांच्या बनावट सह्या असल्याचा आरोप ऋतुब्रत बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष न्यायालयापर्यंत पोहोचला. अखेर उच्च न्यायालयाने ऋतुब्रत बॅनर्जी यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय दिला. तसेच पुढील १० दिवसांत विरोधी पक्षनेतेपदाबाबत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.