
Image Source:(Internet)
नागपूर : दारू पिताना झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात उघडकीस आली आहे. चार जणांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीत ५० ते ५५ वर्षीय मजूर बेशुद्ध पडला. तो मृत झाल्याचे समजून आरोपींनी त्याचा मृतदेह गोणीत भरला आणि लोखंडी पुलाजवळील नाल्यात फेकून दिला. या प्रकरणाचा तपास करत गणेशपेठ पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ नोव्हेंबरच्या रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट परिसरात घडली. मृतकाची ओळख 'टार्जन' अशी असून त्याचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे होते. परिसरात कचरा वेचून तो उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या रात्री तो चार जणांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. टार्जनने शिवीगाळ केल्याने वाद वाढला आणि चौघांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यादरम्यान धर्मा नामक आरोपीने लाकडी दांड्याने टार्जनच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. इतर आरोपींनीही त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. बराच वेळ होऊनही टार्जन शुद्धीवर न आल्याने आरोपींनी तो मृत झाल्याचे गृहीत धरले. त्यानंतर त्याला गोणीत भरून लोखंडी पुलाजवळील नाल्याच्या पाण्यात फेकून दिले. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सुरुवातीला या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले. त्यानुसार गणेशपेठ पोलिसांनी हत्या आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मोहम्मद इस्लाम आणि शशिकांत जामठावार या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर किशोर आणि धर्मा नामक फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.