
Image Source:(Internet)
मुंबई : बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर्स युनियनने मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीतील विद्युत पुरवठा विभागाचा वेतन करार अद्याप लागू झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. प्रशासन आणि मुंबई महापालिकेने मागण्यांना मंजुरी दिल्यानंतरही संबंधित प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे स्वाक्षरीसाठी प्रलंबित असल्याचा आरोप युनियनने केला आहे.
विद्युत पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांनी तब्बल १७ ते २० वर्षे केवळ ५० ते १२० रुपये रोजंदारीवर काम केल्याचा दावा युनियनने केला. कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाल्यापासून कायमस्वरूपी सेवेत समावेश होईपर्यंतची वेतन निश्चिती करण्याची मागणी प्रशासन आणि महापालिकेने मान्य केली असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे युनियनचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी सांगितले.
वेतन कराराची तातडीने अंमलबजावणी, समान कामाला समान वेतन आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन या प्रमुख मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. सरकारने या प्रश्नांवर लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.