डीलिमिटेशनला काँग्रेसचा विरोध नाही,पण राज्यांच्या जागांचे गणित बदलू नका; पृथ्वीराज चव्हाणांचे विधान

    27-Nov-2026
Total Views |
महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा घाट घातल्याचा आरोप

Image Source:(Internet)

नागपूर :
लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने डीलिमिटेशन विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. काँग्रेसकडून या विधेयकाला विरोध केला जाण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. काँग्रेसचा डीलिमिटेशनला विरोध नाही, मात्र या प्रक्रियेत राज्यांच्या लोकसभा जागांचे सध्याचे परस्पर प्रमाण बदलता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या भूमिकेबाबत राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. विरोधी पक्षांना विश्वासात न घेता सरकार डीलिमिटेशन विधेयक आणण्याची तयारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. २९ तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असले, तरी ते स्वतंत्र अधिवेशन नसून यापूर्वी स्थगित न झालेल्या पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुनर्रचना करा, पण राज्यांवर अन्याय नको-
डीलिमिटेशनच्या प्रस्तावातील तरतुदी समोर आल्यानंतरच काँग्रेस आपली अंतिम भूमिका स्पष्ट करेल, असे चव्हाण यांनी सांगितले. मतदारसंघांची पुनर्रचना करण्यास हरकत नाही; मात्र त्यामुळे लोकसभेतील राज्यांच्या जागांचे परस्पर प्रमाण बदलता कामा नये. अन्यथा काही राज्यांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढेल, तर काही राज्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी नमूद केले.

महिला आरक्षणाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल?
महिला आरक्षण लागू करण्यासाठी डीलिमिटेशन आवश्यक असल्याचा केंद्र सरकारचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी फेटाळून लावला. महिला आरक्षणाचा आधार घेत सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका त्यांनी केली. या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकार चुकीची माहिती देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दक्षिण भारतातील राज्यांच्या जागांवर परिणाम होण्याची भीती-
डीलिमिटेशनचा इतिहास सांगताना चव्हाण यांनी १९७६ मधील निर्णयाचा संदर्भ दिला. १९५१, १९६१ आणि १९७१ च्या जनगणनेनंतर मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती. मात्र, लोकसंख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या दक्षिण भारतातील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होऊ नये, यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या जनगणनेच्या आधारे राज्यांच्या जागांची संख्या २५ वर्षांसाठी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २००१ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने ही मुदत आणखी २५ वर्षांनी वाढवली. आता २०२६ मध्ये ही मुदत संपत असल्याने डीलिमिटेशनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नव्या पुनर्रचनेत राज्यांच्या प्रतिनिधित्वाचे संतुलन कायम राहणार का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.