Image Source:(Internet)
नवी दिल्ली : सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून स्वतःची पत्रकार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. केवळ स्वतःला पत्रकार म्हणवून घेतल्याने मान्यताप्राप्त पत्रकारांप्रमाणे समान संरक्षणाचा अधिकार मिळत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेंट क्रिएटर्समध्ये चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान दिल्लीमध्ये पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनाशी संबंधित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी पत्रकारांच्या ओळखीचा आणि त्यांना मिळणाऱ्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
पत्रकारितेची ओळख केवळ दाव्याने ठरत नाही-
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी सांगितले की, वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्या आणि ऑनलाइन माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची ओळख संबंधित संस्थांच्या माध्यमातून निश्चित केली जाऊ शकते. मात्र, सध्याच्या काळात अनेकजण स्वतःला पत्रकार घोषित करतात. त्यामुळे केवळ पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्यांना मान्यताप्राप्त पत्रकारांप्रमाणे समान संरक्षण देता येणार नाही, अशी तोंडी टिप्पणी त्यांनी केली.
आंदोलनांचे वार्तांकन करणारे रील क्रिएटर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांना मान्यताप्राप्त पत्रकारांच्या बरोबरीने संरक्षण देण्यास दिल्ली पोलिसांनीही आक्षेप घेतला होता. याच मुद्द्यावर न्यायालयात चर्चा झाली.
पत्रकारांच्या स्वातंत्र्याबाबतही न्यायालयाचे निरीक्षण-
दरम्यान, पत्रकारितेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच सार्वजनिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या दोन्ही बाबींमध्ये योग्य समतोल असणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती बागची यांनी नमूद केले.
आंदोलनांच्या वेळी पत्रकारांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली जाते, याबाबत आवश्यक वाटल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल, असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीही सूचित केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे पत्रकारिता, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमधील पत्रकारांच्या अधिकारांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाची ही सुनावणीदरम्यानची तोंडी टिप्पणी असून, सर्व कंटेंट क्रिएटर्सना पत्रकारितेचे संरक्षण नाकारण्याचा अंतिम आदेश नाही.