रोहित पवारांच्या विधानावर बावनकुळेंचा जोरदार पलटवार; सुनेत्रा पवारांची बाजू घेत म्हणाले, अशी टीका शोभत नाही!

    26-Nov-2026
Total Views |
 
Bawankule
 Image Source:(Internet)
 
मुंबई : पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला असून, आता पुण्याच्या पालकमंत्रिपदावरूनही राजकीय संघर्ष पेटला आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी केलेल्या विधानांवर भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्याने बावनकुळे यांनी रोहित पवारांवर नाराजी व्यक्त केली.
 
रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार या दिवंगत अजित पवार यांच्याप्रमाणे काम करत नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार यांनी तारतम्य बाळगायला हवे. त्यांना प्रशासन चालवता येत नाही किंवा जबाबदारी सांभाळता येत नाही, अशी टीका करणे योग्य नाही. रोहित पवार यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठल्याचा घणाघातही त्यांनी केला.
 
सुनेत्रा पवार या प्रशासनाचा अनुभव आणि कामकाजाची समज असलेल्या नेत्या आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सरकारमधील आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. त्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही विश्वास आहे. राजकारणातील सक्रिय वाटचाल तुलनेने कमी काळाची असतानाही त्यांनी प्रशासनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
 
मंदार किवळे हल्ला प्रकरणानंतर पुण्यातील परिस्थितीवरून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रिपद स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, फडणवीस यांनी पालकमंत्रिपद स्वीकारल्यास पुणे जिल्ह्याचे नुकसान होईल, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.
 
या विधानावर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. रोहित पवार प्रत्येक विषयात राजकीय टीका करत असून, अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनीही राजकीय टीका करताना परिस्थितीचे भान ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
 
देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत बावनकुळे यांनी सुनेत्रा पवार या ही जबाबदारी सक्षमपणे सांभाळू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
 
एकीकडे मंदार किवळे हल्ला प्रकरणावरून पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कामकाजावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. रोहित पवारांच्या टीकेला बावनकुळे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे हा राजकीय वाद आणखी चर्चेत आला आहे.