नागपुरात MD ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; तिघे पोलिसांच्या ताब्यात, दोघांचा शोध सुरू

    25-Nov-2026
Total Views |
नंदनवनमध्ये NDPS पथकाची पहाटे चार तास मोहीम; ३.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Image Source:(Internet)

नागपूर :
शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत NDPS पथकाने बुधवारी पहाटे विशेष मोहीम राबवत MD ड्रग्जसह तीन तरुणांना ताब्यात घेतले. या कारवाईत २१ ग्रॅम MD पावडर, तीन मोबाईल आणि एक मोपेड असा एकूण ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणातील अन्य दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

न्यू नंदनवन येथील महापालिकेच्या पाण्याच्या टाकीसमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. MD ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचला. यावेळी संशयितांकडून ६३ हजार ६०० रुपये किमतीची २१ ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली. याप्रकरणी हसनबाग येथील शेख समीर शेख शब्बीर (२१), टिमकी येथील शेख माज अब्दुल सत्तार (२१) आणि वृंदावन नगर, नंदनवन येथील इशांत नबी शेख (१९) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर शहानवाज शब्बीर शेख (२४) आणि कमरुनिसा अंसारी (५०) यांचा पोलीस शोध घेत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या अमली पदार्थांचा स्रोत आणि तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.