
Image Source:(Internet)
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ४ ते ८ डिसेंबर २०२६ दरम्यान एकूण १५ अनारक्षित विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत. यामध्ये नागपूर-मुंबई मार्गावर आठ फेऱ्यांचा समावेश असून विदर्भातील अनुयायांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
नागपूरहून मुंबईसाठी चार विशेष गाड्या-
नागपूरहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ४ आणि ५ डिसेंबर रोजी चार विशेष गाड्या धावणार आहेत. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी गाडी ५ डिसेंबरला सकाळी १०.५५ वाजता मुंबईत पोहोचेल. त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता सुटणारी दुसरी गाडी ५ डिसेंबरला दुपारी ४.१५ वाजता पोहोचणार आहे.
५ डिसेंबर रोजी सकाळी ७.४० वाजता सुटणारी तिसरी गाडी रात्री ११.५५ वाजता मुंबईत दाखल होईल. तर सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी चौथी गाडी ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल.
मुंबईहून नागपूरला परतण्यासाठीही चार फेऱ्या-
मुंबईहून नागपूरला परतणाऱ्या प्रवाशांसाठीही चार विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर रोजी रात्री ८.२५ वाजता सुटणारी गाडी ७ डिसेंबरला सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० आणि दुपारी १२.३५ वाजता सुटणाऱ्या गाड्या अनुक्रमे ८ डिसेंबरला मध्यरात्री १२.५५ आणि पहाटे ३ वाजता नागपुरात दाखल होतील. तर ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटणारी गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
याशिवाय दादरहून ट्रेन क्रमांक ०१२५३ ही विशेष गाडी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजता सुटून दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचणार आहे.
विदर्भातील प्रमुख स्थानकांवर थांबे-
या विशेष रेल्वेगाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
अमरावती, कलबुर्गी आणि कोल्हापूरलाही विशेष सेवा-
नागपूर-मुंबई मार्गाव्यतिरिक्त अमरावती, कलबुर्गी आणि कोल्हापूर येथूनही मुंबईसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. कलबुर्गीहून ५ डिसेंबर रोजी ट्रेन क्रमांक ०१२४५, तर अमरावतीहून त्याच दिवशी ट्रेन क्रमांक ०१२१८ मुंबईसाठी रवाना होईल. कोल्हापूरहून ट्रेन क्रमांक ०१४०२ ही ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४० वाजता सुटणार आहे. या गाड्यांच्या परतीच्या फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे.
यूटीएस आणि रेलवन ॲपवरून तिकीट उपलब्ध-
या सर्व विशेष गाड्या अनारक्षित असल्याने प्रवाशांना सामान्य तिकीट दराने प्रवास करता येणार आहे. यूटीएस प्रणाली तसेच रेलवन (RailOne) ॲपद्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध असेल. गाड्यांच्या थांब्यांवरील वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा NTES ॲप तपासावे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी नागपूरसह विदर्भातून हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर जातात. यंदा मध्य रेल्वेने केलेल्या विशेष व्यवस्थेमुळे या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.