ऑपरेशन टायगरच्या चर्चांना वेग; उद्धव ठाकरेंच्या नगराध्यक्षांची शिंदेंच्या बैठकीला हजेरी

    24-Nov-2026
Total Views |
उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Image Source:(Internet)

नागपूर :
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळू लागले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या नगराध्यक्षांच्या बैठकीला ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पारकर लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या घडामोडींवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या सूचक विधानामुळे चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. संदेश पारकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित राहून सुरुवातीलाच भाषण केले. ते ओपनिंग बॅट्समन म्हणून बोलले असतील, तर त्याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असे म्हणत सामंत यांनी राजकीय संकेत दिले. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’बाबत सध्या भाष्य करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने या विषयावर बोलणे टाळत असल्याचे सामंत म्हणाले.

शिंदेंच्या राजकीय खेळीचा अंदाज लागणे कठीण-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचालींचा अंदाज सहजासहजी कोणालाही येत नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाचा दाखला देत त्यांनी शिंदेंच्या राजकीय रणनीतीकडे लक्ष वेधले. ओमराजे निंबाळकर यांचा पक्षप्रवेश कधी झाला, याची कोणालाही आधी कल्पना नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.

शिरसाटांच्या विधानावर सामंतांची प्रतिक्रिया-

दरम्यान, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सुरतहून परतणाऱ्या आमदाराबाबत केलेल्या 'रामनाम सत्य' या विधानावरूनही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. शिरसाट यांच्या वक्तव्याचा आधार घेत एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी अशा विधानांचा वापर होत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनतेला एकनाथ शिंदे यांची ताकद आणि कार्यपद्धती माहीत असल्याचे सामंत म्हणाले. आमची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीनंतर पारकरांची गुपचूप एक्झिट-

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नगराध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, बैठकीनंतर त्यांनी कोणतीही विशेष चर्चा न करता तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पारकर शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या घडामोडींचे नेमके राजकीय परिणाम काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.