
Image Source:(Internet)
नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील बिनाकी मंगलवारी परिसरात घडली. या हल्ल्यात पूजा नीरज आमडे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आरोपी पती नीरज कैलास आमडे याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनाकी मंगलवारी परिसरात ही घटना घडली. नीरज आमडे हा पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.
२३ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात नीरजने हातोडा उचलून पत्नीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात पूजा रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर जखमी पूजाला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी पती नीरज आमडे याला अटक केली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्याचे एपीआय संदीप काळे यांनी घटनेची माहिती दिली.