दारूच्या पैशांवरून वाद विकोपाला; नागपुरात तरुणाच्या पोटात चाकूने वार, तिघांना अटक

    24-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने निर्माण झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना नागपुरातील हजारी पहाड परिसरात घडली. पैशांची मागणी फेटाळल्याचा राग मनात धरून आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात आशीष सोमकुंवर गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारी पहाड येथील सार्वजनिक शौचालयाजवळ रात्रीच्या वेळी आशीष सोमकुंवर याला तिघांनी अडवले. दारू पिण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, आशीषने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढताच तिघांनी त्याला मारहाण केली. याचवेळी सागर धुर्वे याने चाकूने आशीषच्या पोटावर वार करून त्याला रक्तबंबाळ केले.

घटनेनंतर गंभीर जखमी आशीषला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सागर धुर्वे, करण नायडू आणि श्याम नायडू या तिघांना बेड्या ठोकल्या. तिन्ही आरोपी हजारी पहाड परिसरातील रहिवासी असून, करण आणि श्याम नायडू यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेबाबत गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे अधिकारी सारंग मिराशी यांनी माहिती दिली.