सौरव दास यांचा गुन्हा एवढाच की...;माल्या, नीरव मोदींचा दाखला देत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

    24-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे सदस्य सौरव दास यांना लंडनला जाताना विमानतळावर रोखण्यात आल्याच्या कथित प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सौरव दास यांनी कोणताही आर्थिक घोटाळा केला नसल्यामुळेच त्यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले, असा उपरोधिक टोला दिपके यांनी लगावला. विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या आर्थिक घोटाळ्यांतील आरोपींना देशाबाहेर जाण्यापासून रोखले गेले नाही, मग सौरव दास यांच्याबाबत वेगळी भूमिका का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून सौरव दास यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. भारतात कॉकरोच जनता पार्टीने केलेले आंदोलन आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी केलेल्या संघर्षाबाबत अनुभव मांडण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते. मात्र, लंडनला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना रोखण्यात आल्याचा आरोप दिपके यांनी केला. भारताबाहेर जाण्यास त्यांना परवानगी नाकारण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विजय माल्या, नीरव मोदींचा उल्लेख करत सरकारला घेरले-
सौरव दास यांच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे किंवा त्यांनी कोणत्या बँकेची फसवणूक केली आहे, असा सवाल करत दिपके यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. एखाद्याने हजारो कोटींचे घोटाळे केले, बँकांचे पैसे बुडवले, तर त्याला परदेशात जाण्याची मुभा मिळते; मात्र कोणताही घोटाळा न केलेल्या व्यक्तीला रोखले जाते, असा उपरोधिक आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी विजय माल्या आणि नीरव मोदी यांची उदाहरणे दिली. विजय माल्या हजारो कोटींच्या कर्जाच्या थकबाकीप्रकरणी देशाबाहेर गेला, तर नीरव मोदी याच्यावर पंजाब नॅशनल बँकेतील हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. अशा व्यक्तींना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यात सरकार अपयशी ठरले, असा आरोप दिपके यांनी केला.

घोटाळा केला असता तर व्हीआयपी सुविधा मिळाली असती-
सौरव दास यांनीही एखाद्या बँकेची लूट केली असती किंवा मोठा आर्थिक घोटाळा केला असता, तर त्यांनाही व्हीआयपी सुविधा देऊन परदेशात पाठवले असते, असा बोचरा टोला अभिजीत दिपके यांनी लगावला. सौरव दास यांची चूक एवढीच की त्यांनी देशातील बँकांना चुना लावलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. या प्रकरणामुळे नागरिकांच्या परदेश प्रवासाच्या स्वातंत्र्याचा आणि सरकारी यंत्रणांच्या भूमिकेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.