तक्रारीनंतर अजनी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

Image Source:(Internet)
नागपूर : नागपूरच्या Nagpur शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. बीडीएस प्रथम वर्षात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांना कपडे उतरवण्यास, मुर्गा बनण्यास, मुलींचे कपडे परिधान करण्यास तसेच मेसमध्ये वरिष्ठ विद्यार्थ्यांचे उष्टे अन्न खाण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल केले असून, अजनी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, २६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २७ ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत वसतिगृहातील खोली क्रमांक १०४ आणि महाविद्यालयाच्या मेसमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. तीन ज्युनिअर विद्यार्थ्यांवर सिनियर्सकडून दबाव टाकण्यात आला. महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे असेल तर वरिष्ठांच्या सांगण्यानुसार वागावे लागेल, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजनी पोलिसांनी आयुष सी.आर., नरेंद्र सिंह, अमान खान आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने केलेल्या चौकशीनंतर तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्याची कारवाई केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.