
Image Source:(Internet)
मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादात आता नागपूरच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी नागपूर शहराचे नाव बदलून ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, ही संकल्पना उद्धव ठाकरे यांनीच मांडल्याचा खुलासा राऊत यांनी केला. या प्रस्तावाला ठाकरे गटाचा पूर्ण पाठिंबा असून राज्य सरकारने नामांतरासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बाबासाहेबांच्या ऐतिहासिक कार्याचा दाखला-
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूरशी असलेल्या ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख केला. बाबासाहेबांनी नागपूरच्या भूमीतून सामाजिक परिवर्तनाची मोठी चळवळ उभी केली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी नागपूरला ‘दीक्षाभूमी’ हे नाव देणे योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरापेक्षा संपूर्ण नागपूर शहराला दीक्षाभूमी हे नाव देणे अधिक महत्त्वाचे असल्याचेही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. सरकारने निर्णय घेतल्यास ठाकरे गट पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उद्धव ठाकरेंची सूचना असल्याचा खुलासा-
नागपूरच्या नामांतराची कल्पना उद्धव ठाकरे यांनी चर्चेदरम्यान मांडल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूरला दीक्षाभूमी हे नाव मिळावे, अशी त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि नागपूरची दीक्षाभूमी ही देशासाठी प्रेरणादायी ठिकाणे ठरतील, असे मत त्यांनी मांडले. या प्रस्तावाला विरोध झाल्यास त्याला सामोरे जाण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, असेही राऊत यांनी म्हटले.
इंदू मिल स्मारकाच्या खर्चवाढीवर सवाल-
इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाबाबतही संजय राऊत यांनी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. स्मारक उभारणीच्या खर्चात वाढ का झाली, याची माहिती जनतेसमोर मांडली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यास आमचा पाठिंबा असून खर्चवाढीमागील कारणे सरकारने स्पष्ट करावीत, असे ते म्हणाले.
दादरच्या नामांतरावरून सरकारवर टीका-
दादर रेल्वे स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्याची घोषणा केल्यानंतर सरकारने दुसऱ्याच दिवशी स्पष्टीकरण देत हा निर्णय दादर मेट्रो स्थानकासाठी असल्याचे सांगितले होते. या घडामोडीवरून राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या या भूमिकेमुळे आंबेडकरी समाजात नाराजी निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकारच्या घोषणेमध्ये झालेल्या गोंधळावर टीका करत त्यांनी सरकारलाच ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असे संबोधले. या प्रकरणावर न्यायालयातही निर्णय होईल, असे ते म्हणाले.
दादरच्या नामांतरावरून सुरू झालेला वाद आता नागपूरच्या नामांतराच्या मागणीपर्यंत पोहोचला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात ‘नागपूर की दीक्षाभूमी?’ या नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.