चंद्रावरही आता पिकणार बटाटे; शास्त्रज्ञांचा भन्नाट प्रयोग यशस्वी; ७० टक्के चंद्राची माती अन् ३० टक्के गांडूळ खताचा प्रयोग!

    20-Nov-2026
Total Views |
 
Moon
 Image Source:(Internet)
 
वॉशिंग्टन : आतापर्यंत चंद्रावर Moon मानवी वस्ती उभारण्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता चंद्रावर शेती करण्याच्या दिशेनेही शास्त्रज्ञांनी मोठे पाऊल टाकले आहे. चंद्रावरील मातीसारख्या पदार्थात बटाट्याचे पीक घेण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, ७० टक्के चंद्राच्या मातीसारखा पदार्थ आणि ३० टक्के गांडूळ खत यांच्या मिश्रणातून बटाट्याची चांगली वाढ झाल्याचे प्रयोगात दिसून आले. भविष्यात चंद्रावर वास्तव्यास जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी हा प्रयोग महत्त्वाचा ठरू शकतो.
 
चंद्राच्या मातीत शेती करणे मोठे आव्हान-
चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या धूळ आणि खडकांच्या मिश्रणाला वैज्ञानिक भाषेत 'लुनार रेगोलिथ' असे म्हणतात. ही माती पृथ्वीवरील सुपीक जमिनीप्रमाणे नसते. त्यात वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक सेंद्रिय घटक आणि पोषक तत्त्वांची कमतरता असते. शिवाय तिचे कण धारदार असल्याने त्यात थेट शेती करणे कठीण आहे.
 
ही समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेतील संशोधकांनी चंद्राच्या मातीसारख्या नमुन्यांमध्ये गांडूळ खत मिसळून बटाटे उगवण्याचा प्रयोग केला. या प्रयोगाला नासाकडूनही पाठिंबा मिळाला.
 
३० टक्के गांडूळ खत ठरले प्रभावी-
प्रयोगाच्या सुरुवातीला केवळ चंद्राच्या मातीसारख्या पदार्थात बटाटे लावण्यात आले. मात्र, अपेक्षित वाढ झाली नाही. त्यानंतर संशोधकांनी त्यात ५ टक्के गांडूळ खत मिसळले. यामुळे रोपांच्या वाढीत सुधारणा दिसून आली.
 
पुढील टप्प्यात ७० टक्के चंद्राच्या मातीसारखा पदार्थ आणि ३० टक्के गांडूळ खत असे मिश्रण तयार करण्यात आले. या मिश्रणात बटाट्याची चांगली वाढ झाल्याचे संशोधनात आढळले. या प्रयोगासाठी 'मोडोक' (Modoc) या लाल सालीच्या आणि पांढऱ्या गराच्या बटाट्याच्या जातीची निवड करण्यात आली होती.
 
बटाटा ठरणार अंतराळवीरांसाठी पोषणाचा आधार-
या संशोधनाचे नेतृत्व ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीचे वनस्पती जीवशास्त्रज्ञ आयमेरिक गोयर यांनी केले. त्यांच्या मते, कमी जागेत अधिक कॅलरी मिळवून देण्याची क्षमता बटाट्यामध्ये आहे. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि प्रथिने यांसारखे पोषक घटकही असतात.
 
त्यामुळे चंद्रावर दीर्घकाळ राहणाऱ्या अंतराळवीरांना अन्नपुरवठा करण्यासाठी बटाट्याची शेती उपयुक्त ठरू शकते. पृथ्वीवरून सतत अन्न घेऊन जाण्याची गरज कमी करण्यासाठी अशा प्रयोगांना विशेष महत्त्व आहे.
 
नियंत्रित वातावरणात करण्यात आला प्रयोग-
बटाट्याच्या वाढीसाठी संशोधकांनी विशेष वातावरण तयार केले होते. दिवसा सुमारे २२ अंश सेल्सिअस, तर रात्री १८ अंश सेल्सिअस तापमान ठेवण्यात आले. रोपांना पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नैसर्गिक प्रकाशासोबत कृत्रिम प्रकाशाचाही वापर करण्यात आला.
 
चंद्रावर फ्रेंच फ्राईज आणि चिप्सही मिळणार?
भविष्यात चंद्रावर शेती यशस्वी झाली, तर अंतराळवीरांना तिथेच पिकवलेल्या बटाट्यांपासून विविध पदार्थ तयार करता येऊ शकतील. फ्रेंच फ्राईज, चिप्स, बेक्ड पोटॅटो आणि बटाट्याचे सूप यांसारखे पदार्थ चंद्रावरील अंतराळ मोहिमांचा भाग होऊ शकतात, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
 
अंतराळ संशोधनाला नवी दिशा-
अमेरिका आणि चीनसह अनेक देश चंद्रावर दीर्घकालीन मानवी मोहिमा राबवण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत अंतराळवीरांसाठी अन्न, पाणी आणि निवासाची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान असणार आहे. चंद्रावरच भाजीपाला आणि अन्नपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्यास भविष्यातील मोहिमांना मोठा फायदा होऊ शकतो.
 
एकेकाळी चंद्रावर पाणी आहे का, याचा शोध घेतला जात होता. आता त्याच चंद्रावर शेती करण्याची स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात चंद्रावर मानवी वस्ती निर्माण झाली, तर तिथल्या शेतात उगवलेले बटाटे अंतराळवीरांच्या ताटात दिसले तर आश्चर्य वाटायला नको!