Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्रातील न्यायालयांना लक्ष्य करण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि सत्र न्यायालयांना बॉम्बने Bomb उडवून देण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. या प्रकारानंतर पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या असून विविध न्यायालयांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरसह राज्यातील अनेक न्यायालयांना धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे. न्यायालयांमध्ये आयईडी स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या.
छत्रपती संभाजीनगर न्यायालयाची इमारत रिकामी-
धमकीची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाची संपूर्ण इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि इतर उपस्थितांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॉम्बशोधक आणि नाशक पथकाच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.
धमकीमागील व्यक्तीचा शोध सुरू-
राज्यातील अनेक न्यायालयांना एकाच वेळी धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागे कोणाचा हात आहे आणि धमकी कितपत गंभीर आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहितीही समोर आली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयांना मिळालेल्या धमकीमुळे राज्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.