Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य मंत्रिपदासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी संबंधित माजी मंत्र्याच्या पुनरागमनाला अनुकूलता दर्शवली आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील संभाव्य बदल आणि खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
सुनेत्रा पवारांकडील अतिरिक्त खात्याची जबाबदारी मिळणार?
या संपूर्ण घडामोडींमधील महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित माजी मंत्र्याला सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांपैकी एखाद्या खात्याची जबाबदारी देण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
याआधी सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे समजते. सोमवारी सायंकाळी चार वाजता कोअर कमिटीची आणखी एक बैठक होणार असल्याची माहिती आहे.
अर्थखात्यासाठीही राष्ट्रवादीचे प्रयत्न?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत पक्षाला पुन्हा अर्थखाते मिळावे, यासंदर्भात चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, समीर भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील हे नेते उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार की खातेवाटपात बदल?
एकीकडे मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटी, दुसरीकडे अमित शाह यांच्याशी चर्चा आणि पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका, या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाचे राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार का, सुनेत्रा पवारांकडील अतिरिक्त खात्यांची जबाबदारी कोणाकडे जाणार आणि अर्थखाते मिळवण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना यश मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या सर्व घडामोडींबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्याने अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.