Image Source:(Internet)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून, डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जात आहे. विविध वैद्यकीय चाचण्याही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवार यांनी नुकताच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता. ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी त्यांनी माढा तालुक्यातील तुळशी गाव तसेच पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.
मात्र, त्यानंतर नियोजित असलेला त्यांचा पुढील दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला. सुरुवातीला हवामानातील प्रतिकूल परिस्थिती आणि पावसाचे कारण देत दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, आता शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानेच हा दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोलापूर दौरा आटोपल्यानंतर शरद पवार पुण्यात परतले होते. याचदरम्यान त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी तपासणीनंतर रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती वैद्यकीय तपासण्यांनंतर समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर शरद पवार करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे नियोजन होते. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी याबाबत माहिती दिली होती. बारामती आणि भिगवण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. आपण शरद पवार यांची भेट घेऊनच करमाळ्यातील दौऱ्याची तयारी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने दौरे करणाऱ्या शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अधिकृत माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे.