Image Source:(Internet)
नागपूर : विकासाच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे Sayaji Shinde यांनी नागपुरातून जोरदार आवाज उठवला. टोरंट जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या वृक्षतोडीचा निषेध करत त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकार आणि विकासाच्या संकल्पनेवर परखड शब्दांत भाष्य केले.
सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना सयाजी शिंदे म्हणाले की, सह्याद्री ही केवळ डोंगररांग नसून महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आणि असंख्य जीवांचे जीवनाधार आहे. आज शंभर ते दोनशे वर्षांपासून उभी असलेली झाडे तोडली जात आहेत. मात्र, दुसरीकडे आपण गरज नसतानाही मोठ्या प्रमाणात वीज वापरत आहोत. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या जीवनशैलीवर भाष्य करताना ते म्हणाले, “दिवसा विनाकारण लाईट सुरू ठेवणे, रिसॉर्टमध्ये शंभर दिवे लावून ठेवणे, पंचतारांकित हॉटेलमध्ये सतत वीज वापरणे, या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत. प्रत्येकाने वीज आणि पाण्याची बचत केली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी स्वतःपासून सुरुवात करावी.”
सरकारला उद्देशून त्यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. “काय पैसे खायचे ते खा, कोणती प्रगती करायची ती करा; पण झाडांना आणि पर्यावरणाला त्रास देऊ नका. तुम्हाला कितीही विकास करायचा असेल तर करा, मात्र निसर्गाचा विनाश करून कोणता विकास साधणार? शेवटी माणूस ५०० वर्षे जगणार नाही. ज्या दिवशी ऑक्सिजन मिळणार नाही, त्या दिवशी या विकासाचा काय उपयोग?” असा सवाल त्यांनी केला.
पुढे झाडांचे महत्त्व सांगताना सयाजी शिंदे म्हणाले, “आईनंतर जर आपल्याला जगवणारे कोणी असेल, तर ते झाड आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विषय राजकारणापलीकडे जाऊन प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. निसर्गाचे संरक्षण करणे ही केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
यावेळी त्यांनी नागरिकांना सह्याद्री बचाव आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. पाणी आणि विजेची बचत करण्यासोबतच वृक्षतोडीविरोधात जागरूक राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘सह्याद्री वाचवा, झाडे वाचवा आणि पर्यावरण जपा,’ असा संदेश देत सयाजी शिंदे यांनी नागपुरातून पर्यावरण रक्षणाचा आवाज बुलंद केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे.