
Image Source:(Internet)
बीड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बीडमध्ये विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना केवळ 5 हजार रुपयांची मदत देऊन सरकार त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप करत, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीव्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये थेट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. चारा छावण्या सुरू न करणे, शेतकऱ्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे आणि जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीबाबत बोलताना सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगितले. गावपातळीपर्यंत पक्ष मजबूत करण्यासाठी 366 प्रभारी नियुक्त करण्यात आले असून, आगामी काळात शेतकरी आणि अन्य जनहिताच्या प्रश्नांवर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राची विटंबना केल्याच्या मुद्द्यावरून सपकाळ यांनी शिंदे गटावर टीका केली. महाराष्ट्रात गुंडशाही आणि झुंडशाही सुरू असल्याचा आरोप करत शिंदे सेना ही गद्दारांची टोळी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राची पाने फाडण्याच्या कृतीतून शिंदे गटाची मानसिक दिवाळखोरी दिसून येते, असेही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यांबाबतही त्यांनी दावा करत ऐतिहासिक मुद्द्यावरून टीका केली.
अजित पवार यांच्या अपघाताबाबत चौकशी अहवाल अद्याप का आला नाही, असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला. या प्रकरणात तांत्रिक पुरावे समोर आले असूनही सरकार मौन का बाळगते, असा आरोप करत अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याच्या शंका वाढत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या प्रकरणात लपवाछपवी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते परत घेण्याची धमक नसल्याची टीका करत, काही प्रकरणांमुळे राष्ट्रवादीतील नेत्यांना ब्लॅकमेल करून अर्थखाते स्वतःकडे ठेवले जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. या आरोपांवर संबंधित पक्षांकडून प्रतिक्रिया समोर आलेली नाही.