निदा खान प्रकरणात मोठी घडामोड; इम्तियाज जलील यांना न्यायालयाकडून दिलासा, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

    19-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : नाशिकमधील चर्चेत असलेल्या टीसीएस प्रकरणात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. निदा खानला आश्रय देण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या इम्तियाज जलील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे या प्रकरणात जलील यांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयात हजर झाल्यानंतर जामीन मंजूर-

निदा खान फरार असताना तिला लपण्यासाठी मदत केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावर करण्यात आला होता. तपासादरम्यान मतीन पटेल यांनी जलील यांच्या सांगण्यावरून निदाला आश्रय दिल्याचा दावा करण्यात आला होता.

या प्रकरणात नाशिक न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर इम्तियाज जलील न्यायालयात हजर झाले. न्यायमूर्ती खारकर यांच्यासमोर त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

जामिनानंतर इम्तियाज जलील काय म्हणाले?

न्यायालयातून दिलासा मिळाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एखाद्या आरोपीला कायदेशीर प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

निदा खानला भेटल्यानंतर तिने आपली बाजू मांडली होती. तिच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे तिने सांगितले होते. तिचे म्हणणे सत्य असेल तर तिच्या पाठीशी उभे राहू, असे आपण स्पष्ट केले होते. मात्र, तिला कायदेशीर मदत आणि सल्ला देण्यापलीकडे काहीही करता येणार नाही, असेही आपण सांगितल्याचे जलील यांनी स्पष्ट केले.

तसेच, कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देणे हाच गुन्हा ठरत असेल, तर मग सर्व वकिलांनाही तुरुंगात टाकावे लागेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.

निदा खान प्रकरणात याआधीही मोठ्या घडामोडी-

दरम्यान, नाशिकमधील कथित धर्मांतर आणि छळ प्रकरणामुळे निदा खान चर्चेत आली होती. या प्रकरणानंतर संबंधित कंपनी आणि पोलिसांकडून तिच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, तिच्या पतीनेही घटस्फोटाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या निदा खान गर्भवती असून तिलाही न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष-
इम्तियाज जलील यांना जामीन मिळाल्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, निदा खानला मदत केल्याच्या आरोपांसह संपूर्ण प्रकरणातील इतर बाबींचा तपास अद्याप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासात काय निष्पन्न होते आणि या प्रकरणात आणखी कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.