
Image Source:(Internet)
नागपूर : नागपुरातील अंबाझरी तलाव परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार रस्त्यावरील बॅरिकेट्सला धडकून नाल्यात कोसळल्याने ही दुर्घटना घडली. शहरात अपघातांच्या घटना सातत्याने घडत असताना आणखी एका जीवघेण्या अपघाताची नोंद झाली आहे.
गुरुवारी पहाटे सुमारे ४ वाजता MH 49 CD 8390 क्रमांकाची कार अंबाझरी तलाव परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली कार बॅरिकेट्सला जोरदार धडक देत रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह कारमध्ये किती जण प्रवास करत होते, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. चालकाचे नियंत्रण सुटण्यामागे अतिवेग, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारण होते का, याचा तपास सुरू आहे.