शालार्थ घोटाळ्यात पुन्हा अटकेचे सत्र सुरू; सहा महिन्यांनंतर शिक्षक पोलिसांच्या ताब्यात!

    19-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यभर गाजलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा वेग आला असून, तब्बल सहा महिन्यांनंतर सायबर पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. ज्ञानेश्वर शिवराम जाधव (३२) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा येथील चित्रलेखा प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.

पोलिसांनी केलेल्या तपासात जाधव यांचे शालार्थ ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर विभागाने बुधवारी त्यांना अटक केली. या प्रकरणातील ही ४५ वी अटक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणात मोठी कारवाई झाली नव्हती. त्यामुळे तपासाची गती मंदावल्याची चर्चा सुरू होती. मात्र, नव्या अटकेमुळे संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.

शालार्थ घोटाळा गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उघडकीस आला होता. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कथितरीत्या बनावट शालार्थ ओळखपत्रे देण्यात आल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली होती. सुरुवातीला नागपूरपुरते मर्यादित असलेले हे प्रकरण पुढे राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहोचले. नाशिकसह काही भागांतही अशाच प्रकारचे गैरप्रकार उघड झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले.

या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेऊन शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली. राज्य सरकारनेही संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन केली होती. तपासादरम्यान शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि संस्थाचालकांच्या भूमिकेची चौकशी करण्यात आली.

नागपूर विभागात आतापर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, शिक्षक, शाळा संचालक आणि अन्य कर्मचाऱ्यांसह ४५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता पुन्हा एका शिक्षकाला अटक झाल्याने या प्रकरणातील पुढील तपासाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बनावट शालार्थ ओळखपत्रे तयार करण्यामागे नेमके कोण होते आणि या प्रक्रियेला कोणाची मदत मिळाली, याचा शोध सायबर पोलीस घेत आहेत. तपासाची व्याप्ती वाढल्यास काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिकाही चौकशीच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शालार्थ घोटाळ्यातील पुढील कारवाईकडे शिक्षण विभागासह राज्याचे लक्ष लागले आहे.