
Image Source:(Internet)
पिंपरी-चिंचवड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या कथित प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, शायना एनसी यांना कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीला तब्बल 71 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याने केली आहे. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
चेतन पवार यांची वादग्रस्त घोषणा-
ठाकरे सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. शायना एनसी यांच्या कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीला 71 हजार रुपये रोख बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या घटनेचा निषेध करत त्यांनी शायना एनसी यांच्यावर जोरदार टीका केली.
दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'Belonging: A Journey of Love' या पुस्तकाच्या निषेधादरम्यान हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेनंतर शायना एनसी यांनी माफी मागितली असली, तरी ठाकरे गटाचा संताप कमी झालेला दिसत नाही.
कल्याणमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन-
या प्रकरणाचे पडसाद कल्याणमध्येही उमटले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेला काळे फासले. काही आंदोलकांनी प्रतिमा जाळून निषेध व्यक्त केला.
शायना एनसी यांनी जाहीरपणे माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. ठाकरे सेनेचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
जळगावमध्येही महिला आघाडी आक्रमक-
जळगावमध्ये ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडूनही निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला. त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन माफी मागावी, अशी मागणी महिला कार्यकर्त्यांनी केली.
राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता-
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या कथित विटंबनेवरून सुरू झालेला वाद आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. एका बाजूला ठाकरे गटाकडून राज्यभर आंदोलन सुरू असून दुसरीकडे 71 हजारांच्या बक्षीस घोषणेने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावर शिंदे गट आणि संबंधित नेत्यांकडून पुढे काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.