बुलढाण्यात गांजा तस्करीचा पर्दाफाश; कारमधून 20 किलो गांजा जप्त, सात जण पोलिसांच्या ताब्यात

    19-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बुलढाणा : अमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी मेहकर परिसरात कारवाई करत गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आणला आहे. मेहकर–जानेफळ मार्गावरील फर्धापूरजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली गांजाची वाहतूक करणाऱ्या कारवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 20 किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका महिलेसह सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गांजाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मेहकर आणि जानेफळ पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी मेहकर–जानेफळ रोडवरील फर्धापूर परिसरात कारवाई केली. MH 28 CC 9884 क्रमांकाच्या मारुती एर्टिगा कारची तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि संबंधित वाहन ताब्यात घेत आरोपींना पकडले.

या कारवाईनंतर गांजा तस्करीचे जाळे किती व्यापक आहे, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. जप्त केलेला गांजा कुठून आणण्यात आला होता आणि या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, याबाबत तपास सुरू असून, कारवाईसंदर्भात मेहकर पोलिसांकडून अधिक माहिती देण्यात येत आहे.