
Image Source:(Internet)
नागपूर : पोलिसांनी तडीपार केलेला गुन्हेगार चक्क नागपुरातच भाड्याचे घर घेऊन राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने वाठोडा परिसरातील आझाद नगर येथे छापा टाकून शुभम ऊर्फ लिंबू लिंबूडकर (वय २७) याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून गांजा, तलवार, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुभम लिंबूडकर हा हिंगणा रोडवरील विजयनगर, पाख्खीडे लेआउट येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण, दंगल आणि शस्त्र अधिनियमासह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. एका गुन्ह्यात तो फरार असून, त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तडीपारीचे आदेश धाब्यावर बसवून तो आझाद नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता.
दरम्यान, आरोपीच्या वास्तव्याबाबत गुन्हे शाखा युनिट-१ ला गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित घराची झडती घेतली. यावेळी २१७ ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची किंमत १० हजार ८५० रुपये असून, गांजासोबत प्लास्टिक रॅपरचे पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, एक तलवार आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला.
या कारवाईनंतर आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तडीपारीची कारवाई होऊनही शहरात त्याचा वावर सुरू असल्याने या प्रकरणाची चर्चा होत आहे.