दादा, तू आजही डोळ्यांसमोर आहेस’; भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक

    11-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीच्या नात्यासाठी खास दिवस असतो. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाची आणि आठवणींची ही खास वेळ असते. मात्र, यंदाची भाऊबीज सुप्रिया सुळे यांच्यासाठी भावूक करणारी ठरली आहे.

कारण अजित पवार यांच्याशिवायची ही पहिली भाऊबीज आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला. या घटनेने पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकारणात वेगवेगळ्या पक्षांमध्ये असले, तरी दोघांचे भाऊ-बहिणीचे नाते कायमच जवळचे राहिले. राजकीय मतभेद असले तरी त्याचा त्यांच्या कौटुंबिक नात्यावर परिणाम झाला नाही. भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि आपुलकी कायम होती.

यंदाच्या भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे यांना अजितदादांची आठवण आली. त्यांनी सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे अजित पवारांना ओवाळताना दिसत आहेत. यावेळी पवार कुटुंबातील अनेक सदस्यही उपस्थित आहेत. पार्थ पवार देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

या व्हिडिओसोबत सुप्रिया सुळे यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अजितदादांशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज आहे.

दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी बहिणींना अजितदादांची भेट होण्याची उत्सुकता असायची. त्यांच्यासोबत गप्पा, हसणं आणि कुटुंबासोबतचे आनंदाचे क्षण आजही सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यांसमोर आहेत. पूर्वी साधे वाटणारे हे क्षण आता खूप खास आणि मौल्यवान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं.

“दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज. दरवर्षी या दिवसाची आम्हा सगळ्या बहिणींना किती ओढ असायची! यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडला आणि आपल्या असंख्य आठवणींनी मनात गर्दी केली,” असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या आठवणीने सुप्रिया सुळे भावूक झाल्याचं त्यांच्या या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. राजकारणापेक्षा भाऊ-बहिणीचं नातं किती वेगळं आणि खास असतं, हे त्यांच्या पोस्टमधून पुन्हा दिसून आलं आहे