
Image Source:(Internet)
नागपूर : नागपुरात ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. २५ नोव्हेंबरपासून मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नागपुरात आगमन होणार असल्याने त्यापूर्वी सरकारी कार्यालये आणि निवासस्थानांची व्यवस्था सज्ज करण्याचे नियोजन आहे. मात्र, कामे पूर्ण करण्यासाठी आता प्रशासनाकडे मर्यादित कालावधी शिल्लक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिवेशनासाठी ३८६ कामांची आखणी केली असून, त्यात सरकारी कार्यालयांमधील २२९ आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांमधील १५७ कामांचा समावेश आहे. दुरुस्ती, रंगरंगोटी, वीज-पाणी व्यवस्था आणि स्वच्छतेची कामे २७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, सुमारे १५० कामांच्या निविदा अद्याप खुल्या झालेल्या नाहीत. काही कामांना कंत्राटदार मिळालेले नाहीत, तर काहींचे कार्यादेश प्रलंबित आहेत. निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने कामे रखडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सर्व आवश्यक कामे निर्धारित मुदतीत पूर्ण होतील, असा दावा विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी तयारी पूर्ण करण्यासाठी प्रशासन किती वेगाने काम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.