
Image Source:(Internet)
इंदापूर : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील लावंड वस्तीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा फराळ केला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात असून, त्यांच्या शेतीच्या पाण्यासह पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत सरकार करेल, अशी ग्वाही भरणे यांनी दिली.
नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून इंदापूरमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, ही शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याचे सांगत त्यांनी यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच नीरा नदीवरील बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामांबाबत आणि दरवाज्यांमधून होणाऱ्या गळतीच्या तक्रारींची माहिती घेऊन योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलताना कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे भरणे यांनी स्पष्ट केले. पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर केल्यामुळे अग्रीम मदत देणे शक्य झाले असून, उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुलढाण्यात फायनान्स कंपन्यांकडून वाहन कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत सरकारने कारवाई केली असून, मुख्यमंत्री केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. शरद पवार यांनी भेटीसाठी वेळ नाकारल्याच्या चर्चेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत तसेच रामदास कदम यांनी तटकरेंवर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, आज आपण शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे आज कोणत्याही राजकीय विषयावर बोलणार नाही, असे सांगत त्यांनी प्रश्नांना उत्तर देणे टाळले..