‘रामायण’वर नितीश भारद्वाज भडकले; म्हणाले, एकही चांगली गोष्ट नाही!

    10-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव करणारे ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज आता मात्र चित्रपटावर चांगलेच नाराज झाले आहेत. बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले भारद्वाज यांनी चित्रपट पाहिल्यानंतर आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी चित्रपटाला ऑस्कर मिळण्याची शक्यता व्यक्त करणाऱ्या भारद्वाज यांनी आता स्वतःच्या जुन्या प्रशंसात्मक पोस्ट मागे घेतल्या आहेत.

नितीश भारद्वाज यांनी चित्रपटाच्या कथानकातील मांडणीवर गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, ‘रामायण’ हे केवळ एक महाकाव्य नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि आध्यात्मिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटात यशने साकारलेल्या रावणाला उदार, सामाजिकदृष्ट्या न्यायप्रिय आणि निष्पक्ष व्यक्ती म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने रामायणातील मूळ नैतिक मूल्यांनाच धक्का पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे रामायण नव्हे! असे म्हणत त्यांनी चित्रपटाच्या सादरीकरणावरही टीका केली. चित्रपट पाहून आपण अत्यंत दुःखी आणि निराश झालो असून, त्यातील एकही चांगली गोष्ट सांगता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. भडक व्हिज्युअल इफेक्ट्समुळे महाकाव्याचा आध्यात्मिक गाभा आणि त्यातील मूल्यांची जागा घेता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे चुकीचे चित्रण करणारा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर भारद्वाज यांनी त्यातील भव्यता, कलाकारांचा अभिनय, संगीत आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचे कौतुक केले होते. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांचेही त्यांनी अभिनंदन केले होते. मात्र, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी घेतलेली ही बदललेली भूमिका सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.