मराठवाड्यात भीषण दुष्काळ; एल निनोच्या परिणामांचा सरकारला अभ्यासच नाही, आमदार पाटील यांची टीका

    10-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

धाराशिव : मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, एल निनोच्या परिणामांचा सरकारने पुरेसा अभ्यास केलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या हातातून खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम गेले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, २१ व्या शतकातही शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा येथे दिवाळी पाडव्यानिमित्त डॉ. संदीप तांबारे यांच्या वतीने बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना धीर देणे आणि त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. यावेळी शेतकरी, विद्यार्थी आणि नवउद्योजकांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.