राज्य पोलीस दलात बदल्यांचे वारे;दिवाळीनंतर एसपी, डीसीपींच्या बदल्यांची मोठी यादी येण्याची शक्यता

    10-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील पोलीस प्रशासनात पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलांची शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघू शकतात. गृह विभागाकडून यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, २ नोव्हेंबर २०२६ रोजी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गृह विभागाच्या २ नोव्हेंबरच्या आदेशानुसार ठाणे येथील पोलीस उपायुक्त मीना मखवाना, नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक जयंत बजबळे, अंबाजोगाई येथे कार्यरत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, नागरी हक्क संरक्षण नागपूरचे डीवायएसपी विकास संपत नाईक आणि बीडीडीएसचे एसीपी संतोष वैरागडे यांची बदली करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता राज्यातील इतर पोलीस आयुक्तालये आणि जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नागपूर शहर पोलीस दलातील संभाव्य बदल्यांकडे विशेष लक्ष लागले आहे. शहरात सध्या कार्यरत असलेल्या तीन पोलीस उपायुक्तांचा एकाच ठिकाणी नियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना अन्यत्र संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार, याबाबतही पोलीस विभागात चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

विदर्भातील अकोला, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांचाही नियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही नेतृत्वबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या सेवाकाळाचा आढावा आणि प्रशासकीय गरजा लक्षात घेऊन गृह विभागाकडून बदल्यांचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे विदर्भातील पोलीस दलातही नव्या चेहऱ्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली आहे. येत्या चार आठवड्यांत अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने पोलीस प्रशासनावर बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेची मोठी जबाबदारी राहणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करावी लागते. अधिवेशनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच महत्त्वाच्या पोलीस पदांवरील नियुक्त्या निश्चित केल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यंदाच्या अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न यांसोबतच ठाण्यातील चर्चित पूर्णेकर हत्याकांड आणि अन्य संवेदनशील विषयांवरही राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनातील वरिष्ठ पदांवर अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने गृह विभाग निर्णय घेऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या संभाव्य बदल्यांबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर गृह विभागाकडून नेमकी किती अधिकाऱ्यांची बदली केली जाते आणि नागपूरसह विदर्भातील कोणत्या अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळते, याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.