
Image Source:(Internet)
नांदेड : हदगाव शहरात दोन तरुणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुभम राजू राठोड (१९) आणि कृष्णा संतोष चव्हाण (२१) अशी त्यांची नावे आहेत. विष प्राशन करण्यापूर्वी दोघांनी एक व्हिडिओ तयार केला असून, त्यामध्ये हदगाव पोलीस ठाण्यातील बीट जमादारावर त्रास दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. कोणत्याही गुन्ह्यात सहभाग नसतानाही आपल्याला शिवीगाळ, धमक्या देऊन पैशांची मागणी केली जात असल्याचा दावा या तरुणांनी व्हिडिओत केला आहे.
या कथित त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगत दोघांनी कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक खरेदी केले. त्यानंतर शहराजवळील निर्जन टेकडीवर जाऊन विष प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच दोघांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. दरम्यान, तरुणांनी केलेल्या आरोपांची अद्याप पुष्टी झालेली नसून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. पोलीस तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.