नागपुरातील देवनगर हत्याकांडातील मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

    10-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून २७ वर्षीय अमन उर्फ बॉबी सपाटे याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या देवनगर हत्याकांडाचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुख्य आरोपी अक्षय मडावी याला प्रतापनगर चौकातून अटक केली. त्याच्यासह त्याला फरार असताना आश्रय देणाऱ्या पियुष नेनवानी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बजाजनगर पोलिसांच्या डीबी पथकाने या हत्याकांडातील अन्य तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरच्या रात्री सुमारे १२.३० वाजता हुडकेश्वर येथील अमन उर्फ बॉबी हा मित्र अक्षय नोकरकर याच्यासोबत देवनगर परिसरात प्रसाद राऊत याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. यावेळी देवनगर चौकातील ज्यूस सेंटरसमोर काही तरुण रस्त्यावर फटाके फोडत होते. कारच्या रस्त्यात फटाके फोडण्यास मनाई केल्याने दोन्ही गटांत वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. मुख्य आरोपी अक्षय मडावी आणि त्याच्या साथीदारांनी अमनवर चाकूने सपासप वार केले. पोटावर गंभीर वार झाल्याने त्याला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मुख्य आरोपी अक्षय मडावी फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सुमारे २२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. अक्षय हा प्रतापनगर चौकातील अतिथी रेस्टॉरंटजवळ लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

तपासादरम्यान पियुष नेनवानी याने अक्षयला फरार असताना आश्रय दिल्याचे उघड झाले. अक्षय हा देवनगर हत्याकांडातील वांछित आरोपी असल्याची माहिती असूनही पियुषने त्याला राहण्यासाठी ठिकाण, सिमकार्ड आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करून दिली. तसेच पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पियुषलाही अटक करण्यात आली.

दरम्यान, बजाजनगर पोलिसांच्या डीबी पथकाने या हत्याकांडातील सुजल शेडाम, आदित्य कलसकर आणि समीर कावले या अन्य तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली किया सोनेट कार, एक मोपेड आणि आयफोनसह तीन मोबाइल असा एकूण १७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.