‘असा कलाकार पुन्हा होणे नाही’; नाना पाटेकरांच्या निधनाने मोदी भावूक

    08-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनयातील त्यांची तीव्रता, वेगळेपणा आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व फारच दुर्मीळ होते, अशा शब्दांत मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका आपल्या अभिनयाच्या वेगळ्या शैलीने जिवंत केली. त्यांच्या अभिनयात केवळ संवादफेक नव्हती, तर भूमिकेची खोली आणि भावनांची ताकदही दिसून येत असे. त्यामुळे त्यांनी साकारलेली अनेक पात्रे प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली, असे पंतप्रधानांनी म्हटले.

रोखठोक स्वभावाचीही मोदींकडून आठवण-
नाना पाटेकर यांची ओळख त्यांच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्त्या स्वभावासाठीही होती. मनातले विचार मांडताना त्यांनी कधीही शब्दांची भीड बाळगली नाही. सामाजिक प्रश्नांवर ते परखडपणे बोलत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा गुणही तितकाच प्रभावी होता, असे मोदी यांनी नमूद केले.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

गोव्यात काळाने घेतला घास-

नाना पाटेकर यांनी वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावला येथील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी सलग सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांप्रती पंतप्रधान मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या. “ओम शांती,” अशा शब्दांत त्यांनी या दिग्गज कलाकाराला अखेरचा निरोप दिला.