अभिजीत दीपके यांना मोठा झटका; 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी दिल्ली पोलिसांची चौकशी सुरू

    08-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या संसद मार्चदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

या तपासाच्या पार्श्वभूमीवर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. IANSच्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा तपास केला जात आहे.

हिंसाचारामागे नेमकं कोण?
पोलिसांकडून या प्रकरणात BNSच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आंदोलनादरम्यान हिंसाचाराला नेमके कोण जबाबदार होते, त्यांची भूमिका काय होती आणि हिंसाचार पूर्वनियोजित होता का, याचा तपास केला जाणार आहे.

आंदोलनात बाहेरील व्यक्तींनी घुसखोरी करून हिंसा केली होती का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. याशिवाय पोलिसांवर झाल्याचा आरोप असलेला हल्ला, तोडफोड, पोलिसांच्या वाहनांचे नुकसान आणि सार्वजनिक मालमत्तेची झालेली हानी या सर्व बाबी तपासाच्या कक्षेत आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जुलै महिन्यातील हिंसाचारासंदर्भात दाखल करण्यात आलेले १७ एफआयआर रद्द करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

10 ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाची तयारी-
सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाची घोषणा केली आहे. यापूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथेही पक्षाकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आता 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जंतरमंतरवर आंदोलनासाठी सीजेपीकडून दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, आंदोलनासाठी किमान 10 दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितल्याची माहिती आहे. तरीही पक्षाचे नेते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे 10 ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी सुरू झालेल्या 20 जुलैच्या हिंसाचाराच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापले-
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांकडूनही दिल्लीत आंदोलन सुरू आहे. इंडिया आघाडीचे खासदार गेल्या काही दिवसांपासून राजधानीत आंदोलन करत आहेत.

जंतरमंतरनंतर आता इंडिया आघाडीच्या आंदोलनाचा मोर्चा कनॉट प्लेसकडे वळला आहे. या आंदोलनात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचीही उपस्थिती राहिली. कथित निवडणूक गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

एकीकडे सीजेपीच्या 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या नेत्यांशी संबंधित 20 जुलैच्या हिंसाचाराची चौकशी सुरू झाल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.